Saturday, January 29, 2011

इतिहासाचे राजकारण : लोकमत की ब्राह्यणी मत?

भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक वादांचे यात विवेचन केल्याचे भासवण्यात आले आहे. प्रत्यक्षात विषमतावादी, शोषणवादी, ब्राह्यणी वैदिक व्यवस्थेचेच समर्थन ह्या दोन्ही अग्रलेखांत झालेले आहे. संपादकीय हे त्रयस्थपणे तसेच डोळसपणे लिहिलेले तसेच वर्तमानपत्र चालविणाऱ्या व्यवस्थापनाचे साधारण धोरणात्मक प्रतिबिब असते. हे दोन्ही अग्रलेख अत्यंत पूर्वग्रहदूषित बहुजनविरोधी मानसिकतेतून लिहिले गेलेले व एकविसाव्या शतकातील प्रथमदशक संपल्यावरही 'ब्राह्यणी विषमतावादी व्यवस्थे'चे समर्थन करणारे आहेत.
दि. ९ जानेवारीचा अग्रलेख दिशाभूल करणारा तर १६ जानेवारीचा अग्रलेख अनैतिहासिक घटनांचे उदात्तीकरण करणारा आहे. मुळातच दोन्ही अग्रलेखांचा उद्देश मराठा समाजास, मराठा सेवा संघास, संभाजी ब्रिगेड व मराठा समाजातील राजकारणी बांधवांना जाणीवपूर्वक बदनाम करणे हाच आहे. आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात 'जैन व बौद्ध धर्मीयां'चे शिरकाण केल्याचा इतिहास आहे. त्यानंतर भारतावर स्थापित झालेल्या वैदिक धर्म व राजव्यवस्थेतील शोषणवाद, वर्णवाद, जातवाद इत्यादी कारणांस्तव पुढच्या काही शेकडा वर्षांत भारतातील जैन व बौद्ध जनतेने इस्लामचा स्वीकार केला. ज्या धर्माविरुद्ध आद्य शंकराचार्यांनी लढा उभारला होता, ते जैन व बौद्ध धर्म आज जगातील अनेक राष्ट्रांत त्यांचे राष्ट्रीय धर्म आहेत. याउलट वैदिक धर्म भारतातूनही हद्दपार झाला आहे. आम्हाला सर्वश्रेष्ठ व्यक्ती भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध अथवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आद्य शंकराचार्यांचे विषमतावादी तत्त्वज्ञान आज मर्यादित व विशिष्ट अभ्यासकांनाच प्रेरणादायी आहे. इतिहास आम्ही मानू तोच व आम्ही लिहू तसाच, ही आमची भूमिका कधीच नव्हती, आजही नाही.
अग्रलेख लिहिताना लेखकाने दि. ६ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालपत्राची बातमी वाचलीच असावी. योगायोगाने संबंधित बातमी महाराष्ट्र राज्यातील भिल्ल समाजाशी संबंधित असून, अहमदनगर जिल्ह्यात १३ मे १९९४ रोजी घडलेल्या अत्याचारी घटनेशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. मार्कंडेय काटजू व न्या. मा. श्रीमती ग्यानसुधा मिश्रा म्हणतात, 'भिल्ल ह्या खालच्या जातीचा एकलव्य धनुर्विद्येत अर्जुनाहूनही सरस ठरू नये यासाठी गुरू द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागून घेणे, ही द्रोणाचार्यांनी केलेली अत्यंत शरमेची बाब होती. खरेतर द्रोणाचार्य हा एकलव्याचा गुरूच होऊ शकत नाही. त्यामुळे मुळातच एकलव्याकडून गुरुदक्षिणा मागण्याचा कोणताही नैतिक वा वैधानिक अधिकार द्रोणाचार्यांकडे निश्चित नव्हता.' निकालपत्राचा पूर्ण मसुदा चिकित्सा म्हणून वाचकांनी मिळवून अवश्य वाचावा. निकालपत्रात पुढे हेही म्हटले होते की, भारतभूमीतही परकीय आक्रमकांच्या टोळ्या स्थायिक झालेल्या आहेच. हेच परकीय वंशज सध्या सत्ताधीश आहेत. इत्यादी. यावरून आपण सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे संभाजी ब्रिगेडचे प्रशिक्षित संस्कृती विध्वंसक आहेत, असे म्हणणार काय? आर्य मूळचे भारतीय की परकीय, हा वादही टिळकांपासून चालू आहे. महात्मा जोतिबा फुले म्हणतात, विद्येमुळेच नीती, मती, गती मानवास प्राप्त होते. भारतीय बहुजन समाजावर आजपासून शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मनुस्मृतीच्या धर्मकायद्यानुसार शिक्षण, अर्थार्जन, संरक्षण, शस्त्र बाळगणे, समुद्र उल्लंघन इत्यादी बंदी होत्याच. हे वास्तव आहे. याचा नायनाट करणे म्हणजे ब्राह्यणद्वेष होत नाही. हा लढा जैन, बुद्धापासून सुरू आहे.
दि. १६ जानेवारीचा अग्रलेख 'दादोजी कोंडदेव' प्रकरणाशी संबंधित आहे. त्यातील अनेक संदर्भ दादोजी कोंडदेवच्या गुरूपदासारखच अनैतिहासिक व असत्य आहेत. पोर्तुगीज लेखक कास्मो द गार्दो याने सन १६९५मध्ये शिवचरित्र पोर्तुगीज भाषेत लिहिले. त्यात त्याने छत्रपती शिवाजी पोर्तुगीज होते, असे विधान केले आहे. त्या एका आक्षेपार्ह विधानाव्यतिरिक्त उर्वरित पुस्तकात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक परिवर्तनाचे 'असामान्य नेता' म्हणून वर्णन केलेले आहे. पुढे या पोर्तुगीज पुस्तकाचे भाषांतर इंग्रजी भाषेत बंगाली इतिहासकार डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी 'अॅडमिनीस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मराठाज' या नावाने केले. याच इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रा. विजया कुळकर्णी यांनी 'मराठ्यांची प्रशासन व्यवस्था' या नावाने महाराष्ट्रात युती शासन असताना केले. काही कारणाने ती पुस्तके प्रकाशित झाली नाहीत. नेमके कुळकर्णी कुटुंबाच्या परिचयातील प्रा. रा.रं. बोराडेसर मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनीच ते पुस्तक प्रकाशित केले. ५ जानेवारी २००४ला भांडारकर प्रकरण घडले. त्याचा बदला म्हणून शिवसैनिकांनी प्राचार्य बोराडेसरांच्या घरावर वरील पुस्तकाचा आधार घेऊन हल्ला केला. या वेळीही महानगरपालिका, पुणे यांनी अनैतिहासिक समूहशिल्पातून दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवला. त्याची प्रतिक्रया फक्त औरंगाबादेत उमटली. हे साम्य आहे.
जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने 'शिवाजी : हिदू किग इन इस्लामिक इंडिया' हे वादग्रस्त पुस्तक जून २००३मध्ये भारतात प्रकाशित केले. त्याचे प्रथम समीक्षण ऑगस्ट २००३मध्ये शिवसेनेच्या सामना मुखपत्रात देशपांडेंनी 'अत्यंत वाचनीय उत्तम पुस्तक' म्हणून केले. शिवशाहीर ब.मो. पुरंदरेंनीही या पुस्तकाचे समर्थन केले. आम्ही हे पुस्तक नोव्हेंबर २००३मध्ये वाचले. त्यानंतर सतत वर्तमानपत्रे, शासन, विधानसभा इत्यादी ठिकाणी माहिती दिली. हे पुस्तक लिहिण्यासाठी जेम्स लेन सन १९८६पासून १७ वर्षे पुण्यात होता. त्या वेळी त्यास पुण्यातील अनेकांनी घरच्यासारखे वागवले. लेनने महाराष्ट्रीय लोक आपल्या राष्ट्रीय दैवत असलेल्या छत्रपती शिवाजींबाबत किती नीच पातळीवर आपसात खोडसाळ विनोद करतात, हेच लिहिले. त्याने जे 'ऐकले तेच लिहिले.' प्रश्न एकच आहे जेम्स लेनला हा खोडसाळ विनोद सांगणारे महाराष्ट्रीय कोण आहेत? यात जेम्स लेन दोषी नाही. पुण्यातील ब्राह्यणांच्या घरांत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत खालच्या पातळीवर चर्चा होते. हे सत्य आहे. असो, यातून ५ जानेवारी २००४ रोजी भडारकरवर संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर बहाद्दर कार्यकर्त्यांनी कारवाई केली. आजही यापैकी एकाहत्तर मुले जिवंत आहेत. आम्ही जिवंत आहोत. भडारकर संस्था आहे. गेल्या सहा वर्षांत एकातरी शहाण्याने या मुलांची भेट घेऊन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे काय? भडारकर संस्थेने त्यांचे जाळलेले वा नष्ट झालेले ग्रंथ कळवावेत, संभाजी ब्रिगेडने केवळ काही फोटोंच्या काचा फोडल्या, कपाटे पालथी केली, स्वत: पोलिसांना कळविले. जर ठरविले असते तर भडारकर संस्था जाळणे शक्य होते. ५ जानेवारी २००४ला संभाजी ब्रिगेडला नावे ठेवणारे प्रामाणिक पत्रकार, सत्य समजल्यावर भांडारकर जाळलीच पाहिजे म्हणाले. या कारवाईनंतरच भडारकर संस्था सर्वार्थाने झगमगाटात आली. अग्रलेख लिहिणाऱ्या व्यक्तीने भडारकर संस्थेचे संभाजी ब्रिगेडने केलेले नुकसान अधिकृत यादी घेऊन यावे. थोडक्यात, या पार्श्वभूमीवर अनैतिहासिक शिल्पातून दादोजी कोंडदेवचे शिल्प अधिकृतपणे व कायदेशीररीत्या हटविण्यात आले.
दादोजी कोंडदेव ब्राह्यण असल्यामुळेच समूहशिल्पातून हटविल्याचे म्हणणे, ही ब्राह्यणी मानसिकतेची विकृती आहे. तसेच प्रत्यक्ष सत्य पुराव्यावरून दादोजी कोंडदेव हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पूर्ण काळ केवळ व केवळ शहाजी महाराजांचे शत्रू आदिलशहा याचाच सेवक व हस्तक होता. दादोजीचा पुतळा अचानक काढला वा खोटा इतिहास तयार केला, हे म्हणणे चूक आहे. उलट खोट्या इतिहासाचे शुद्धीकरण झाले आहे. शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव नव्हते, हे जून १८६९मध्ये महात्मा जोतिबा फुलेंनी 'शिवाजीचा पवाडा' या प्रदीर्घ पोवाड्यातून मांडले. 'मासा पाणी खेळे, गुरू कोण असे त्याचा' असा प्रश्न विचारला. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूर यांनी १२ ऑक्टोबर १९२० रोजी लिहिले की, 'रामदास किवा दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते' ही क्लृप्ती ब्राह्यणांचीच आहे. त्याबद्दल इतिहासात कुठेही सबळ पुरावा नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सन १९२५मध्ये स्पष्टपणे सांगितले की, दादोजी कोंडदेव हे शिवचरित्रातील भटी गौडबंगाल आहे. म्हणजेच सुमारे १४० वर्षे जुना हा 'गुरू-शिष्य' वाद आहे. जेम्स लेनने पुण्यातील महाराष्ट्रीय जे बोलतात, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने इतिहास अभ्यासकांची समिती जुलै २००८मध्ये नेमली होती. समितीने जाहीर आवाहन केले होते. समितीत कोण होते, यापेक्षा समितीने जे पुरावे तपासलेत, ते असत्य की सत्य हे महत्त्वाचे होते. समितीने दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते. हा अहवाल डिसेंबर २००८मध्ये दिला. गेल्या दोन वर्षांत एकही इतिहासतज्ज्ञ हे खोटे आहे, असे पुरावे देऊन समोर आलेला नाही. हा शासनाचाच अहवाल आहे. शेवटी यानिमित्ताने लोकमतला आमची विनंती आहे की, इतिहास या विषयाला आपण हात घातलाच आहे, तर इतिहासातील असेच अनेक वाद मिटविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. इतिहासातील वाद मिटल्याशिवाय वर्तमानातील संघर्ष संपणार नाही. लोकमतमधून नामवंत तसेच सत्याग्रही इतिहासाचे पुरस्कर्ते यांचे लेख दोन्ही बाजूंकडील प्रकाशित करावे. अथवा विविध ठिकाणी जाहीर परिसंवाद ठेवावेत, हीच विनंती.

इतिहास हा सतत संशोधनाचा विषय आहे, असे म्हणायचे व त्याला समाजभावनांचाही आधार द्यायचा, हे दुटप्पीपणाचेच लक्षण आहे. नोव्हेंबर २००६मध्ये डॉ. वि.गो. खोबरेकरांचा 'शिवकाल १६३० ते १७०७' हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. ते म्हणतात, 'इ.स. १६३०पर्यंत तरी दादोजी कोंडदेव हे शहाजी राजाकडे नोकरीला होते असे दिसत नाही. इ. स. १६३६मध्ये दादोजीचा प्रथम संबंध शहाजींशी आला.' यानंतर १६४२पर्यंत शहाजी, जिजाऊ, संभाजी, शिवाजी, तुकाई, एकोजी एकत्रच बेंगरूळला होते. आदिलशहाच्या फौजेने शहाजी महाराजांच्या जहागिरीचे मुख्य ठिकाण पुणे शहर जाळले. त्या वेळी दादोजी कोंडदेव आदिलशाहीत कोंडाणा सुभेदार होता.