Wednesday, March 24, 2010

समाजाला निकोप साहित्याची गरज - ऍड. खेडेकर
नागपूर - साहित्यामध्ये समाजाला बदलविण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्यिकांनी समाज घडविणारे निकोप लेखन करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. दोन दिवस चाललेल्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचा आज सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्‍त केले.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, अमेरिकेचे विचारवंत डॉ. थॉम वोल्फ, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, बाळासाहेब लुंगे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, प्रा. जैमिनी कडू, नितीन सरदार, ज्येष्ठ सत्यशोधक व माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, डॉ. साहेबराव खंदारे, सुमतीदेवी धनवटे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक धवड, आमदार दीनानाथ पडोळे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम कडू, अनंतदादा चोंदे, विजयकुमार ठुबे, मधुकर मेहकरे आदी उपस्थित होते.
परखड भाषणात ऍड. खेडेकर म्हणाले, जगातील ५८ देशांना तुकाराम माहिती आहे; परंतु आमच्या भारतीयांना तो अजूनपर्यंत समजला नाही. तुकाराम व महात्मा फुले यांच्या विचारांवर अमेरिका व युरोपमध्ये क्रांती होते. तुकारामांचे साहित्य थोर आहे; परंतु फारच कमी घरांमध्ये त्यांचे ग्रंथ आढळतात, ग्रंथ असले तरीही ते आम्ही समजून घेतले नाहीत. त्यांच्या साहित्यावर आज चिंतनाची खरी गरज आहे. संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस चिंतन झाले, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविले गेले. हीच संमेलनाची खरी फलश्रुती होय.
ऍड. खेडेकर यांनी साहित्यासोबतच आजच्या पत्रकारितेवरही ताशेरे ओढले. पत्रकारांनी भान ठेवून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी तोंडसुख घेतले. अमेरिका व युरोपसारखे देश संघाला पोसत असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. वोल्फ यांनी आपल्या भाषणातून नागपूरकरांना महात्मा फुले यांचे विचार समजावून सांगितले. समाजक्रांती घडविणारे म. फुले विदेशातील लोकांना फारसे माहिती नाहीत, याचा खेद वाटतो. फुले सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या व सरळ भाषेत हृदयातील भाषा बोलले. फुलेंना सामाजिक क्रांतीचा जनक संबोधत ते म्हणाले, बहुजनांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुलींच्या उत्थानासाठी ते लढले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची आज आवश्‍यकता आहे.
महाकवी गायधनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, तुकाराम जगाला माहिती झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले, अभ्यास झाला. फुले, गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांना विदेशातील अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली.
यावेळी प्रा. सुधाकर मोहोड, प्रा. कडू, सुमतीताई धनवटे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. वोल्फ, प्रा. पुरके, अशोक धवड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. जैमिनी कडू यांनी सत्काराला उत्तर दिले. संचालन प्रा. मीनाश्री पावडे यांनी केले.
पुरंदरेंना हटवा
मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडीचा प्रस्ताव आहे. त्याचा विरोध करण्याचा प्रस्ताव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला.

No comments:

Post a Comment